Ad will apear here
Next
विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या...
जनकवी पी. सावळाराम यांचा आषाढी एकादशीला तिथीनुसार जन्मदिन असतो आणि त्यांची जन्मतारीख आहे चार जुलै. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात पी. सावळाराम यांच्या ‘धागा धागा अखंड विणू या’ या गीताबद्दल...
...........
बालपणी एक खेळ खेळायचो...आकाशातले ढग पाहून त्याचे आकार ओळखायचो. कल्पनेचा कुंचला जणू आकाशाच्या कॅनव्हासवर फिरायचा आणि मग आम्ही म्हणायचो बघ...बघ...तो हत्ती दिसतो, कुणी म्हणायचं दोन शिंगं असलेली गाय दिसतेय, कुणी म्हणायचं तिकडे मारुतीबाप्पा दिसतोय, तर कुणी म्हणायचं हा तर डिट्टो गणपतीबाप्पा. बालपणीचा हा खेळ वयानं मोठे झालो तरी खेळावासा वाटतो. वेगवेगळ्या आकृत्या ढगांमध्ये पहायच्या...आषाढातल्या ढगांकडे पाहाताना मात्र मला सर्वत्र विठ्ठलच दिसू लागतो...आषाढमेघ काळाकुट्ट, पण पाण्याने ओथंबलेला...विठ्ठलाचंही तसंच, भक्तांसाठी करुणेनं ओथंबलेला, कृपेची बरसात करणारा...हा विचार मनात आल्याबरोबर कानात टाळमृदंगाच्या साथीनं ‘जय जय रामकृष्ण हरी’चा गजर ऐकायला येऊ लागतो. दिंड्या-पताका घेऊन आषाढी वारी करणारे वारकरी डोळ्यापुढे येतात, चंद्रभागेच्या वाळवंटी दाटलेला भक्तजनांचा महापूर आणि आषाढी एकादशीला आनंदाचे तरंग लेवून रोमांचित झालेलं विठूरायाचं पंढरपूर! काय वर्णावा तो आषाढीचा सोहळा!! 

आषाढी एकादशीला जनकवी पी. सावळाराम यांचा तिथीनुसार जन्मदिन असतो आणि त्यांची जन्मतारीख चार जुलै! पी. सावळाराम यांनी लिहिलेली चित्रपटगीतं, भावगीतं आणि भक्तिगीतांनी आजही मराठी मन आनंदित होतं. त्या गीतांमधल्या भावमाधुर्यावर लुब्ध होतं. पी. सावळाराम यांच्या कवित्वाचा धागा थेट मराठी संस्कृतीशी घट्ट जोडला गेला आहे. महाराष्ट्राचं लाडकं दैवत विठ्ठल, संपूर्ण जगाला अचंबित करणारी आषाढीची वारी आणि विठूरायाची पंढरी कवीच्या कवितेत अवतरली नाही तरच नवल!

विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या...

पहाटे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील महापूजा दर वर्षीप्रमाणे डोळे भरून पाहण्यात आणि आकाशवाणीवरून सर्व श्रुतींचे कान करून ऐकण्यात धन्यता मानणारे लाखो भक्तजन या महाराष्ट्रात आहेत. माननीय मुख्यमंत्री सपत्नीक पूजा करतात आणि त्यांच्याबरोबर असं एक वारकरी दाम्पत्य असतं, की त्यांच्याकडे पाहताना पी. सावळारामांची ‘धागा धागा अखंड विणू या...’ ही आशाताईंच्या भक्तिरसपूर्ण स्वरांमध्ये चिंब भिजलेली आणि वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली रचना आवर्जून आठवते. सारखं त्या दाम्पत्याकडे लक्ष जातं...साधंसुधं, पण भक्तिभावाच्या रेशीमधाग्यांनी विणलेलं लुगडं ती नेसलेली असते आणि तो...कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळा, सदरा, धोतर किंवा पायजमा, मराठी मातीचे धूलिकण अंगावर मोठ्या अभिमानानं लेवून आलेला...विठूरायाच्या दर्शनानं अवघ्या जन्माचं सार्थक झाल्याची भावना डोळ्यांमध्ये साठवलेलं ते दाम्पत्य पाहिलं, की साक्षात विठ्ठल रखुमाईचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. अभिमानानं ऊर भरून येतो या महाराष्ट्र भूमीत जन्म झाला म्हणून...हा महाराष्ट्र संतसज्जनांचा, थोर नेत्यांचा आणि परंपरांचा पाईक असणारा. पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सौभाग्यवतींना, तसंच वारकरी दाम्पत्यालाही. पांडुरंगाच्या दरवाज्याशी जे जोडपं विशिष्ट वेळी येतं त्याला पहिला मान...ही परंपरा वर्षानुवर्षं महाराष्ट्रानं जपलीय...अशीच पिढ्यान् पिढ्या चालावी...कारण या पूजेच्या परंपरेद्वारे फार मोठा एकात्मतेचा संदेश सर्वदूर पोहोचतो. विठाईमाऊलीजवळ जसा कोणताही भेदभाव नसतो, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच सारे भक्त विठूरायाला सारखेच...पी. सावळाराम यांनी या गीताद्वारे काय सुरेख वर्णन केलंय पाहा 

अक्षांशाचे रेखांशाचे
उभे आडवे गुंफून धागे
विविधरंगी वसुंधरेचे
वस्त्र विणले पांडुरंगे
विश्वंभर तो विणकर पहिला
कार्यारंभी नित्य स्मरू या । धागा धागा...

पी.सावळाराम (फोटो सौजन्य : आठवणीतली गाणी)पी. सावळारामांना ‘जनकवी’ संबोधलं जातं. किती सार्थ विशेषण आहे हे! कवी-लेखकांची सामाजिक बांधिलकी त्यांच्या साहित्यकृतीतून दिसलीच पाहिजे. कारण स्वांत सुखाय जरी लिहिलं गेलं, तरी रसिकांपर्यंत ती कृती पोहोचते तेव्हा ती कवी-लेखकाची राहतच नाही. ती रसिकांची होऊन जाते. त्या संस्कृतीचा आरसा बनून राहते. संस्कृतीचं दर्शन कळत-नकळत प्रतिबिंबित होतच असतं. पी सावळारामांसारख्या प्रतिभावान कवीला याचं भान नक्कीच होतं. याची प्रचिती त्यांच्या सर्व रचनांतून आपल्याला येते. ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ असं सांगून आपल्या लेकीला सासरी पाठवणारी आई घरोघरी दिसते. त्याचप्रमाणे ‘लिंबलोण उतरता, अशी का झालीस गं बावरी, मुली तू आलीस आपुल्या घरी’ असं म्हणून नवविवाहित सुनेचं स्वागत करणारी सासूही पी. सावळारामांनी भावगीतातून चित्रित केली आहे. ‘हृदयी जागा तू अनुरागा’ असं म्हणत जीवनसाथीबरोबर संसाराची सप्तपदी घालणारी सहचारिणी असो, की ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ असं मातृसुखात न्हालेली ती...अशी कितीतरी स्त्रीरूपं पी. सावळारामांच्या भावगीतातून आपल्या मनाला सुखावतात. लतादीदी आणि मंगेशकर भावंडांसाठी ‘कल्पवृक्ष कन्येसाठी...’ हे गीत लिहून त्यांनी पितृमहात्म्यच वर्णिलं आहे. साडेपाचशेहून अधिक गीतं पी. सावळाराम यांनी लिहिली. प्रत्येक गीतामधली प्रासादिकता, रसात्मकता आणि भावमधुरता केवळ अप्रतिम!

पी. सावळाराम यांच्या नावातही एक गंमत आहे. खरं म्हणजे त्यांचं नाव निवृत्तिनाथ रावजी पाटील. सुरुवातीला निवृत्तिनाथ पाटील याच नावानं त्यांनी कविता लिहिल्या. वि. स. पागे हे त्यांचे वर्गमित्र. त्यांनी ह. ना. आपट्यांची ‘उष:काल’ ही कादंबरी वाचली. त्यात सावळ्या नावाची व्यक्तिरेखा त्यांना खूप आवडली. निवृत्तिनाथ आणि सावळा या दोघांमध्ये त्यांना खूप साम्य वाटलं होतं. म्हणून ते आपल्या लाडक्या मित्राला सावळ्या म्हणूनच हाक मारू लागले. म्हणून निवृत्तिनाथाचा झाला सावळा! पुढे सावळाराम पाटील याऐवजी पी. सावळाराम या नावानं निवृत्तिनाथ प्रसिद्ध झाला. कारण त्या वेळी सी. रामचंद्र, व्ही. शांताराम अशा नावांची फॅशन आली होती. चित्रपटासाठी गीतलेखन, कथा-पटकथा, संवादलेखन करणारे पी. सावळाराम घराघरात लोकप्रिय झाले. भालू चित्रपटातील ‘पर्ण पाचू सावळा सावळा, मी वारकरी आगळा..’ ही बाबूजींच्या आवाजातली विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेली पी. सावळाराम यांची रचना जेव्हा मी प्रसारित करते, तेव्हा डोळ्यापुढे चित्रपटातली कथा, नायक किंवा इतर गोष्टी आठवत नाहीत. साक्षात संत सावतामाळी यांचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. आपला मळा, काळ्या आईची सेवा यातच विठाईमाऊलीला पाहणारे संत सावतामाळी यांच्या मनातली भावना पी. सावळाराम यांनी शब्दबद्ध केली असं वाटतं. 

आषाढी एकादशी सर्वत्र साजरी होत असताना, संतांचे अभंग कानावर पडत असताना पी. सावळारामांची आवर्जून आठवण येतेय. सावळ्या विठ्ठलाची पंढरी, वारकऱ्यांच्या भजनात दंग झालीय. वाखरी तळावर असलेल्या कमानीवर संत नामदेवांचा एक अभंग लिहिलाय...
 
झळझळीत सोनसळा, कळस दिसतो सोज्वळा।
बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर।। 

या पंढरीच्या विठूरायासाठी सर्व संतांनी अभंग रचलेच; पण आधुनिक कवींनाही विठूरायाच्या भक्तीचा महिमा वर्णन करण्यासाठी कविता लिहिण्याचा मोह आवरला नाही. एकसंध समाजाचं स्वप्न संतांनी पाहिलं, तसंच पी. सावळारामांच्या या गीतातूनही अवतरलं. एकात्मतेचा धागा विणण्यासाठी त्यांनी लिहिलं...

करचरणांच्या मागावरती
मनामनाचे तंतू टाका,
फेकून शेला अंगावरती
अर्धी उघडी लाज राखा,
बंधुत्वाचा फिरवीत चरखा
एकत्वाचे सूत्र धरू या।। 

पांडुरंगाचं मनोमन दर्शन घेताना पी. सावळारामांचंही स्मरण करू या आणि विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या.

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZWDBE
Similar Posts
सप्तपदी हे रोज चालते... आज २१ डिसेंबर, जनकवी पी. सावळाराम यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या, वसंत प्रभूंनी संगीत दिलेल्या आणि लतादीदींनी गायलेल्या एका सुंदर गीताचा... सप्तपदी हे रोज चालते...
चाफा बोलेना... संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा बोलेना’ हे गाणं. १९ जानेवारी हा वसंत प्रभूंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद
मृदुल करांनी छेडित तारा... सुमन कल्याणपूर नावाचे शांत, सोज्वळ, सुशील आणि सुमधुर स्वर आणि रमेश अणावकर नावाचे, नेमकी भावना व्यक्त करणारे नि सुरांशी जुळवून घेणारे शब्द.... अवतीभवतीचा कोलाहल विसरायला लावणारी शक्ती या शब्द-सुरांपाशी असते. सुमन कल्याणपूर यांचा ८३वा वाढदिवस २८ जानेवारीला झाला, तर आज, ३० जानेवारीला रमेश अणावकर यांचा १६वा स्मृतिदिन आहे
जरा विसावू या वळणावर... बघता बघता आणखी एक वर्ष सरलं... निरोपाचा दिवस जवळ आला... ही वेळ असते मागे वळून पाहायची आणि पुढच्या वाटचालीची दिशा ठरविण्याची... त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात आज पाहू या सुधीर मोघे यांचं हे अतिशय सुंदर गीत... जरा विसावू या वळणावर...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language